शिवाजी सावंतगारगोटी: म्हसवे (ता.भुदरगड) येथील अक्षय मोरे या अविवाहित तरूणाने सर्व रूढी परंपराना झुगारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. आपल्या मोठ्या भावाच्या आकस्मित मृत्यूने पोरक्या झालेल्या बाळासह भावजयीस त्याने पत्नी म्हणून स्विकारले. विधवा भावजयीशी विवाह करून अक्षयने रूढी-परंपरेच्या बेड्या तोडल्या. अन् आपल्या भावाच्या मुलाचा आणि पत्नीचा तो आधार बनला.म्हसवे येथील मोतेश मोरे यांचा विवाह १५ जून २०१९ रोजी रांगोळी (ता.हातकणंगले) येथील स्वाती माने हिच्याशी झाला. दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. या दाम्पत्याला एक गोंडस मुलगा झाला. बाळाच्या येण्याने त्यांचा संसार आणखीन आनंददायी बनला होता. मात्र या दोघांच्या सुखी संसाराला काळाची द्रुष्ट लागली.मोतेश व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले. यातच मोतेशचा २४ मे २०२१ रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. मोरे व माने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. अन् पत्नी स्वातीच्या आयुष्यात अंधार पडला. आता पुढील आयुष्यात माझे,माझ्या बाळाचे कसे होणार? असे अनेक प्रश्न तीच्या मनात घोळत होते. यातच स्वातीच्या पुढील आयुष्यासाठी माने कुटुंबियांनी तीच्या लग्नाचा विचार केला. मोरे कुटुंबातील सदस्यांनी घरात चर्चा सुरू केली.यावर मोतेशचा लहान अविवाहित भाऊ अक्षयने वहिणीसोबत लग्न करून बाळासह स्वीकार करायची तयारी दाखविले. वडीलबंधु वारल्यावर त्याचे बाळ आणि पत्नी यांना वाऱ्यावर न सोडता पाठचा असलेल्या या भावाने मोठ्या हिमतीने आणि समाज रूढी झुगारून आपल्या कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला आहे. मग मोरे व माने कुटुंबीयांनी एकत्र बसून त्यांच्या विवाहाला संमती दिली. स्वातीने आपल्या बाळाच्या आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार करून संमती दिली.मंगळवारी(दि.२२)रोजी हा अनोखा मंगल विवाह सोहळा रांगोळी (ता.हातकणंगले) येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्र मंडळीच्या उपस्थित व बिद्री साखर कारखानाचे संचालक मधुकर देसाई, सरपंच सर्जेराव देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विधवांचा सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा अक्षय व स्वाती यांचा हा पुर्नविवाह समाजासमोर आदर्श असा पुर्नविवाह ठरला आहे.
रूढी-परंपरेच्या तोडल्या बेड्या, अविवाहित दिराने बांधली विधवा भावजयीशी लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:27 PM