जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराजवळ असणाऱ्या संभाजीपूर गावातील एक विवाहिता गेल्या सहा दिवसांपासून घरासमोरच दारात तंबू घालून ठिय्या मारून बसली आहे. सासरची मंडळी घरात व पोलीस तक्रार घेईनात म्हणून या विवाहितेने हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तिला न्याय मिळणार का, अशी भावना व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी, मूळची इचलकरंजी येथील या महिलेचा संभाजीपूर येथील तरुणाशी साडेसहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर किरकोळ व अन्य कारणातून घरगुती वाद सुरू आहेत. हा वाद मिटविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. दरम्यान, संबंधित विवाहिता सहा दिवसांपूर्वी सासरी आली होती. यावेळी तिला सासरच्या मंडळींनी घरात न घेता सर्वजण दरवाजाला कुलूप लावून बाहेर निघून गेले. त्यावेळेपासून तिने दारातच तंबू ठोकून ठिय्या मारला आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर तिला समुपदेशन केंद्रात तक्रार नोंदविण्यास सांगण्यात आले. समुपदेशन केंद्रात तक्रार करूनही पोलीस टाळाटाळ करत आहेत. उलट पतीची तक्रार घेतली जाते. तर न्याय मागण्यासाठी आपण पतीच्या दारात असणे हा गुन्हा आहे का, असे तिचे म्हणणे आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींचा संपर्क होऊ शकला नाही.