शाहूवाडी: तालुक्यातील करंजोशी येथील श्री राजर्षि शाहू अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर अकॅडमीच्या अध्यक्षांनी अनैसर्गिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात अकॅडमी अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अकॅडमीचे अध्यक्ष संजय बळीराम लोकरे (रा. आंबर्डे ता. शाहूवाडी) याला अटक केली आहे. याप्रकारानंतर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गोवर करंजोशी गावच्या हद्दीत राजर्षि शाहू करिअर अकॅडमी आहे. येथे पोलिस व सैन्य दलाचे प्रशिक्षण दिले जाते. २६ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता संजय लोकरे याने पीडित विद्यार्थ्याला आपल्या खोलीत बोलावून पायाचे मॉलीश करावयाचे आहे असे सांगितले.
पायाचे मॉलीश करून झाल्यावर लोकरे याने पीडित विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी दिली. घटना घडून अकरा दिवस उलडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली. अधिक तपास उपविभागीय अधिकारी जयकुमार सुर्यवंशी करीत आहेत.