शिरोळ : येथील नगरपालिकेच्या विविध विषयसमितीच्या सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या बांधकाम सभापतिपदी कुमुदिनी कांबळे, पाणीपुरवठा सभापतिपदी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी करुणा कांबळे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे स्थायी समितीवर सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचेच वर्चस्व राहिले.
मंगळवारी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समितीच्या सभापती निवडी ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सदस्यांच्या जागेइतकेच अर्ज दाखल झाले. त्यानंतर निवडीची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतिपदी कुमुदिनी कांबळे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापतिपदी सुरेखा पुजारी, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी राजेंद्र माने, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी करुणा कांबळे, तर उपसभापतिपदी भाजपच्या कविता भोसले यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतिपदी जयश्री धर्माधिकारी, स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, संदीप चुडमुंगे, नगरसेवक उपस्थित होते.
फोटो - २२१२२०२०-जेएवाय-०३-कुमुदिनी कांबळे, सुरेखा पुजारी, करुणा कांबळे, जयश्री धर्माधिकारी, राजेंद्र माने.