रमेश सुतार : बुबनाळ
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अकरा जागांवर महिलांना बिनविरोध करून बुबनाळ गावाने राज्यात नवा आदर्श निर्माण केला होता. मात्र, यंदा पारंपरिक दोन गटांत निवडणूक? लागणार असल्याने बिनविरोधाची शक्यता मावळली आहे. गत पाच वर्षांत सुकाणू समितीचे वर्चस्व, सदस्य पतीचा होणारा हस्तक्षेप यातून बिनविरोधाची झालेली सुरुवात पुन्हा एकमेकांच्या विरोधात गेली आहे. टोकाच्या राजकीय संघर्षासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावाने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक? बिनविरोध करून सर्व अकरा जागांवर महिलांना संधी देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला बळकटी देऊन जातीय व सामाजिक सलोख्याचा नवा संदेश देण्याचे काम बुबनाळ गावाने केले आहे. बुबनाळ हे चार हजार लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील सधन गाव आहे. गावात सहकारी पाणीपुरवठा संस्था, सेवा संस्था, पतसंस्था व दूध संस्थेच्या माध्यमातून सहकाराचे जाळे विणलेले आहे. मात्र, येथील सत्तासंघर्ष, राजकीय ईर्षा पराकोटीला पोहोचलेली होती. २०१० साली गावाने पहिल्यांदा एकी दाखवत अकरांपैकी दहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणले होते. एका उमेदवारासाठी निवडणूक? लागली होती. मात्र, २०१५ च्या पंचवार्षिक निवडणुकीत शंभर टक्के बिनविरोध करून यश मिळविले असून बुबनाळ गाव जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात आदर्शवत ठरले आहे. पुरुषांसाठी पाच जागा असून देखील सर्व जागांवर महिलांना संधी देऊन महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. गत पाच वर्षांत सुकाणू समिती आणि सदस्यांचे पती यांच्या हस्तक्षेपामुळे होणारे वाद अशा अनेक कारणांमुळे यंदा बिनविरोधाची चिन्हे मावळली आहेत.
चौकट - दोन गटांत निवडणूक
यड्रावकर गट, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी यातूनच दोन गट निर्माण होऊन निवडणूक होणार यात शंका नाही. सुकाणू समितीकडे ११ जागांसाठी ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या बघता माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
* एकूण प्रभाग - चार * एकूण मतदार संख्या - २५७०