आजरा - सदाशिव मोरे
आजरा तालुक्यातील होनेवाडी व पेद्रेवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध व माघारीच्या चर्चेने ग्रामपंचायतीचे राजकारण ढवळून निघाले आहे. तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या नेत्यांना गावातील चक्रव्यूहात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. होनेवाडी व पेद्रेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. गवसे, एरंडोळ, खोराटवाडी, जाधेवाडी, हात्तीवडे, वाटंगी, किणे, हालेवाडी यासह अन्य गावातून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मागील पाच वर्षात दुखाविलेली एकमेकांची मने, एकमेकांना विचारात न घेता दाखल केलेले अर्ज यासह वैयक्तिक लाभांच्या योजना न दिल्याच्या रागातून अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुसवे काढण्याचे सुरू असलेले प्रयत्न, दिली जाणारी आश्वासने, ज्येष्ठ मंडळींच्या सुरू असलेल्या गाठीभेटी यांमुळे निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींचे राजकारण ढवळून निघाले आहे. चिमणे, वाटंगी, सरोळी, हाळोली, सुळे, निंगुडगे, किणे, शिरसंगी, हात्तिवडे, देवर्डे येथील निवडणुका चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. या गावात साखर कारखाना व तालुका संघ व बॅंकेचे संचालक आहेत. येथील ईर्षा टोकाला पोहोचली आहे. तालुक्यात वजनदार असलेल्या नेत्याला गावातील राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकविण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. माघारीच्या शेवटच्या दिवशी कोणाची माघार होणार, निवडणूक बिनविरोध की तुल्यबळ लढती होणार, गावाच्या दृष्टीने कोणाची उमेदवारी योग्य-अयोग्य, कोणाचे राजकारण कोणत्या गल्लीत चालणार यावरून पारकट्यावरील चर्चा रंगल्या आहेत.
काळ्या बाहुलीची अंत्ययात्रा
तालुक्याच्या पश्चिम भागात देवाच्या नावाने असणाऱ्या गावात अर्ज भरण्यापासूनच राजकीय धुळवड सुरू आहे. तिरडीवरून काळ्या बाहुलीची अंत्ययात्रा काढून गावातील प्रमुख व्यक्तींच्या स्मशानभूमीत ती जाळण्याचा प्रकार घडला आहे; तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी गावाच्या वेशी भंडारा, गुलाल व लिंबू टाकून बांधवून घेतल्या आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी काढलेली काळ्या बाहुलीची अंत्ययात्रा चांगलीच चर्चेत आली आहे.