प्राथमिक शिक्षकाची संस्था असेलेल्या पगारदार संस्थेतील ठेवी बुडणार नाहीत. या आशेने शिक्षकासह शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांनी हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमध्ये आपली रोजीरोटी कमाई ठेव म्हणून ठेवली.
२०१८ मध्ये ही संस्था डबघाईला आल्याची वार्ता कळताच सर्वच ठेवीदार हबकून गेले. संचालक मंडळाने आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे संस्था डबघाईला आली. २०१८ मध्ये सहकार विभागाने या संस्थेवर तालुका उपनिबंधकाची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
शिक्षक सभासद असलेल्या या संस्थेमध्ये ४ कोटी ५० लाखांची कर्जे आहेत. तर कर्जाच्या चौपट १६ कोटींच्या ठेवी आहेत. ठेवीमध्ये शिक्षक सभासदांच्या ठेवी नगण्य आहेत. शेतकरी, छोटे व्यवसायिक, सर्वसामान्य गृहिणी, व्यापारी यांच्या ठेवीच्या रकमा मोठ्या असल्याने कर्जाची वसुली आणि ठेवी देण्याचे प्रमाण यामध्ये चौपट फरक आहे. यामुळे ठेवीदारांच्या ठेवी रामभरोसे झाल्या आहेत.
या शिक्षक पतसंस्थेवर प्रशासक असलेल्या उपनिबंधक प्रगती बागल यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये ऑडिट केले नाही. थकीत कर्जदार शिक्षकांविरुद्ध दावे ही दाखल केले नाहीत. यामुळे कर्जाची वसुली ठप्प झाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांनी ठेवलेल्या ठेवीची रक्कम परत मिळावी यासाठी उपनिबंधकांचे उंबरे झिजवत असूनही याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
चौकट
सहकार कायद्याच्या कलम ८८ खाली संचालक मंडळावर जबाबदारी निश्चितीची कारवाई दोन वर्षे प्रलंबित असल्याने तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने पात्रता नसलेल्या संस्थामध्ये १६ कोटींची गुंतवणूक केल्यामुळे पगारदार नोकरांची तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था डबघाईला आली आहे.