लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भगवान महावीर यांचा अहिंसा आणि शांततेचा संदेश देत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) मार्फत रविवारी कोल्हापूरात काढण्यात आलेल्या अहिंसा रनला स्पर्धकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
कोल्हापूरसह देशभरातील ६५ शहरांमध्ये रविवारी ही मॅरेथॉन निघाली. देशातील या पहिल्याच उपक्रमाची नोंद लिम्का बुक आणि गिनिस बुक ऑफ वर्ल्डने घेतली आहे. सकाळी सहा वाजता सुरु झालेल्या तीन, पाच आणि दहा किलोमीटर मॅरेथॉनसाठी कसबा बावडा येथील अलंकार हॉलपासून धैर्यप्रसाद हॉल आणि कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाजवळून परत असा मार्ग होता. या रनमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या रनसाठी जैन सोशल ग्रुप, डीवायपी ग्रुप, रग्गेडियन ग्रुप, सकल जैन समाजाचे सहकार्य होते. आमदार ऋतुराज पाटील, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, संजय घोडावत, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अप्पर पुलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते या तीन गटांतील स्पर्धांना सुरवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना प्रमाणपत्र, पदक देण्यात आले.
मॅरेथॉनसाठी जीतोचे अध्यक्ष गिरीश शहा, नेमचंद संघवी, रोमचे समन्वयक जितेंद्र राठोड, मुख्य सचिव अनिल पाटील, खजानिस रमणलाल संघवी, राजीव पारीख, हर्षद दलाल, अतुल शहा, आशीष कोरगावकर, सुरेंद्र जैन, युवराज ओसवाल, शीतल कोरडे, जयेश ओसवाल, लेडीज विंगच्या अध्यक्षा श्रेया गांधी, सचिव माया राठोड, आरती संघवी, वैशाली संघवी, पायल पोरवाल, स्विटी पोरवाल, यूथ विंगचे चिंतन राठोड, चिन्मय कर्नावट, अक्षत शहा, पुनित कोठारी, आकाश राठोड, रितीका पाटील, शुभम ओसवाल, अभिषेक गांधी यांनी परिश्रम घेतले.