कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशाचा इतिहास मोडी लिपीत लिहून ठेवलेला आहे. आजपर्यंत अनेक संशोधने झाली असली, तरी अद्याप इतिहासातील काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे युवकांनी मोडी लिपीचा अभ्यास करून अप्रकाशित इतिहास समोर आणावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.शहाजी कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित केलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक संकल्पना रूढ केल्या आहेत. याचा दाखला आपल्याला गड-किल्ल्यांची पाहणी केल्यानंतर कळेल. सातत्याने नवीन इतिहास आणि सत्य इतिहास जगासमोर मांडण्यासाठी मोडी लिपी उपयुक्त ठरेल. मोडी लिपीची कला अवगत केल्यानंतर सांस्कृतिक वारसाचे अनेक पैलू सर्वांच्या समोर येतील.इतिहास अभ्यासक डॉ. इंद्रजित सावंत म्हणाले, शिवकालीन, पेशवेकालीन आणि उत्तरकालीन इतिहासातील मोडी लिपीचा अभ्यास केला पाहिजे. इतिहास संशोधनाबरोबरच भावी पिढीकडे राष्ट्रीय संपत्ती वारसा पोहोचविण्यासाठी मोडीलिपीचे जतन - संवर्धन आणि संरक्षण गरजेचे आहे.
५ डिसेंबर हे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. यामध्ये २२५विद्यार्थ्यांनी सहभागी झाले आहेत. सहायक संचालक बाळकृष्ण कुंडले यांनी स्वागत केले. माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक कोल्हापूर पुराभिलेखागार अधिकारी गणेशकुमार खोडके यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे, शैलश वाघ, संजय आवळे, विनायक पाटील, विक्रम ठमके, सर्जेराव वाडकर, अमेय जाधव, प्रशांत शिरोलीकार, राहूल जाधव यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.