इंदुमती गणेश ।कोल्हापूर : शासनाने मोठ्या दिमाखाने पुनरुज्जीवित केलेल्या कोल्हापूर चित्रनगरीच्या अवास्तव दरामुळे निर्मात्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
चित्रनगरीत अजूनही काही लोकेशन्स, सोईसुविधांचा अभाव असल्याने सध्या आकारलेले दर तुलनेने जास्त आहेत. येथे चित्रीकरणाचा ओघ वाढवायचा असेल तर दर कमी करून व्यावसायिकांच्या अपेक्षेनुसार नवी लोकेशन्स तयार करावीत, अशी मागणी येथील चित्रपट व्यावसायिकांनी केली आहे.
कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षांच्या लढ्याचे फलित म्हणून शासनाने चित्रनगरीचे पुनरुज्जीवन केले आहे. मुख्य स्टुडिओ आणि पाटीलवाडा या दोन देखण्या इमारती, त्यांच्या प्रत्येक दिशेला वेगवेगळी ३२ लोकेशन्स, रस्ते, बागबगीचा, पार्किंग, पथदिवे अशी चित्रनगरी चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे. मात्र चित्रीकरणासाठी शासनाने ठरविलेले भाडे दर अवास्तव आहेत, अशी चित्रपट व्यावसायिकांची तक्रार आहे. हे दर ठरविताना स्थानिक चित्रपट व्यावसायिक किंवा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी सल्लामसलत केलेली नाही.
याबद्दल प्रकल्पाचे अधिकारी दिलीप भांदिगरे यांना विचारले असता त्यांनी चित्रनगरीचे दर मुंबईतील फिल्म सिटी, पुण्यातील स्टुडिओच्या दरापेक्षा ५० टक्क्यांनी कमी असल्याचे सांगितले. मात्र, चित्रनगरीच्या लोकेशन्सचे एका दिवसाचे भाडे पाहता ते जास्त असल्याचे लक्षात येते. एकाच इमारतीच्या प्रत्येक लोकेशनचे दर वेगवेगळे आहेत, जे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय जीएसटी, वीज बिल, एसीचे दर वेगळे. कोल्हापूर चित्रनगरीत गेल्या सहा महिन्यांत दोन ते तीन चित्रपटांचे प्रत्येकी दहा दिवसांचे चित्रीकरण झाले आहे. हा आकडा तुलनेने कमी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शासनाने कमीत कमी दर आकारले तर येथे निर्माते, दिग्दर्शकांचा ओढा वाढणार आहे. एकदा नियमितपणे चित्रीकरण सुरू झाले, मालिकांच्या निर्मात्यांचा ओघ वाढला की पुढे भाडेदरात वाढ करणे अधिक संयुक्तिक ठरेल.
उद्घाटन नाही, प्रसिद्धीचा अभावगेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने अद्याप चित्रनगरीचे अधिकृतरीत्या उद्घाटन झाले नाही. मुंबई, पुण्यासह देशभरातील महागड्या आणि मालिकांसाठी दोन-तीन वर्षांसाठी आधीच बुक झालेल्या स्टुडिओंना कोल्हापुरात एक पर्यायी स्टुडिओ उभारला आहे, याची माहितीच चित्रपट किंवा मालिका निर्मात्यांना नाही. वेबसाईट, सोशल मीडियाचा वापर करून चित्रनगरीची प्रसिद्धी करणे गरजेचे आहे. ....या सोईसुविधांचा अभावचित्रनगरीत अजूनही पाण्याची सोय नाही. पाटीलवाड्याचा मधला पोर्च खूपच लहान असल्याने येथे चित्रीकरण करता येत नाही. स्टुडिओतील फ्लोअरचा आकार खूपच कमी आहे, त्यामुळे सेटअप व्यवस्थित लावता येत नाही. वाडा, चाळ, कलाकारांना राहण्यासाठी सर्किट हाऊस आणि फ्लोअर अनेकविध वापरासाठी एक लोकेशन तयार होणे गरजेचे आहे. यापूर्वी आम्ही वारंवार या सूचना केल्या आहेत. मात्र, व्यवस्थापनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील विकासकामे करताना तरी स्थानिक ज्येष्ठ दिग्दर्शकांशी व अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करून लोकेशन्स तयार करण्यात यावीत, अशी मागणी चित्रपट व्यावसायिकांनी केली आहे.लोकेशन्सचे दर (प्रतिदिन) (शिवाय जीएसटी, सीएसटी १८ टक्के वाढीव)पाटीलवाडा - तळमजला : ३० हजारपाटीलवाडा - पहिला मजला : २२ हजार रुपयेबाह्य परिसर : २० हजारस्टुडिओचा तळमजला :१५ हजारमुख्य स्टुडिओ : २० हजारउत्तर बाजू (न्यायालय, प्रवेशद्वार, महाविद्यालय) :१८ हजारबाह्य परिसर : १७ हजारपश्चिम बाजू (पोलीस ठाणे) : २८ हजारस्टुडिओचा पहिला मजला : ६२ हजार ५००बाह्य परिसर : २२ हजारमुख्य प्रवेशद्वार : ४ हजारबाह्य परिसर : ६ हजारगोडावून : ४ हजारवॉटर टँक : ६ हजारमंदिर : ५ हजारबाह्य रस्ते : २० हजारअंतर्गत रस्ते : १९ हजारकंपाऊंड वॉल : ३ हजारपार्किंग : १० हजारबसस्टॉप : ५ हजारकॅँटीन : ५ हजारचित्रनगरीचा परिसर :१५ हजारमुंबई-पुण्यामध्ये चित्रपट मालिकांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे तेथील भाडेदराची तुलना कोल्हापूर चित्रनगरीशी करून चालणार नाही. चित्रीकरण सुरू होण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात कमीत कमी दर आकारला जावा व त्याची माहिती व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसिद्धी केली पाहिजे.- मिलिंद अष्टेकर(चित्रपट व्यावसायिक)शासनाने उत्पन्नाचा विचार करण्याआधी चित्रनगरीत अधिक सोईसुविधा देण्याला प्राधान्य द्यायला हवे. अजूनही येथे व्यावसायिकांच्या अपेक्षेप्रमाणे काही लोकेशन्स नाहीत. अन्य स्टुडिओंच्या तुलनेत येथे चित्रीकरण करणे स्वस्त पडले तरच चित्रपट किंवा मालिकांचे निर्माते चित्रनगरीला प्राधान्य देतील.- बाळा जाधव(कार्यवाह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)