येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाची लगबग असल्याने राज्यात प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सणासुदीचा काळ असल्याने स्थानकात गर्दी वाढू लागली आहे. बसेसच्या फेऱ्याही वाढू लागल्या आहेत. त्यात अनेक बसचालक फलाटवर न लावता थेट जाण्याच्या मार्गावरच बसेस उभ्या करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह इतर बसेसनाही फलाटवर बस लावण्यास अडचण निर्माण होत आहे. इप्सित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांना जी हवी ती बस वेळेत मिळत नाही. अनेक बसेस अशा उभ्या केल्याने फलाटवर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना ऐनवेळी धावपळ व गोंधळाची स्थिती निर्माण होते. अनेक महिलांना लहान मुले व साहित्य सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. अनेक बसेस तर स्वच्छतागृहाशेजारीच उभ्या केल्या जातात. अस्ताव्यस्त लावलेल्या बसेसमुळे अनेकदा अपघात घडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे चालकांनी बस लावताना जागरूक असणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
अनेकदा डेपोमधून बस बाहेर पडतानाच अनेक प्रवाशांना त्यात प्रवेश दिला जातो. त्यामुळे फलाटवर उभ्या असलेल्या प्रवाशांची गोंधळाची स्थिती निर्माण होते. याशिवाय कुठेही बस उभी केल्यामुळे बसला धडक होण्याची शक्यता असते. यात सुधारणा अपेक्षित आहे.
- राम कारंडे, प्रवासी
प्रतिक्रिया
ग्रामीण भागात जाणाऱ्या काही बसेस फलाटवर न लागताच डेपोतून बाहेर आल्यानंतर झाडाखाली उभ्या केल्या जातात. फलाटवर वाट पाहत असलेल्या प्रवाशांना बस अक्षरश: शोधावी लागते. त्यामुळे यात बदल होणे गरजेचे आहे.
- अनुजा साळवे, प्रवासी
कोट
सर्वच चालकांना बसेस फलाटवरच लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेकवेळा प्रवाशांच्या आग्रहामुळेच बसेस अन्यत्र नाइलाजाने थांबवाव्या लागतात. चालकही त्या सूचना काटेकोरपणे पाळतात.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. कोल्हापूर विभाग
फोटो : २८०८२०२१-कोल-एसटी बस ०१, ०२, ०३