कृष्णात पाटील ।सावर्डे : जिल्ह्यात एकीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे धामणी खोरा परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गावोगावी एकत्र येऊन, धामणी प्रकल्प अपूर्ण असल्याने येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बैठका घेत आहे. आतापर्यंत लोकशाही पद्धतीने मोर्चा, आंदोलने केली तरीही शासन दरबारी पाझर फुटलेला नाही. अखेर येथील जनतेने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे रणशिंग फुंकले आहे. गाववार बैठका घेऊन शासन व लोकप्रतिनिधीबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
धामणी खोरा परिसरात पन्हाळा, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील ५० ते ६० गावांचा समावेश होतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तीन तालुक्यात विभागलेल्या धामणी खोºयात आजही अनेक प्रश्नांनी थैमान घातले आहे. जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्न आजही धगधगताच राहिला आहे. धामणी नदी उथळ असल्यामुळे सप्टेंबरनंतर वाहणाºया पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत जाते. डिसेंबरअखेर वाहणाºया पाण्याचा स्रोत पूर्ण कमी होत असल्यामुळे दरम्यानच्या काळात वाहणारे पाणी एकदाच अडवून ठेवावे लागते. नैसर्गिक पाण्याच्या कमतरतेमुळे डिसेंबर महिन्यातच नदी कोरडी पडते. त्यामुळे थेंब अन् थेंब पाण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होते.
चौके ते आंबर्डेपर्यंतच्या ३९ गावांतील शेतकºयांना शेतीच्या पाण्यासाठी शासनाने गवशी, गारिवडे, म्हसुर्ली, घेरिवडे, आंबर्डे याठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. परंतु या गळक्या बंधाºयांनी पाण्याचा साठा होत नसल्याने केवळ वाहतुकीसाठी बंधाºयांचा उपयोग होतो. त्यामुळे पावसाळा संपताच पाण्यासाठी दरवर्षी शेतकºयांना स्वखर्च करून बंधाºयाशेजारीच मातीचा पर्यायी बंधारा घालावा लागतो. ट्रॅक्टर, जेसीबीच्या साहाय्याने हा बंधारा पूर्ण करावा लागतो. यासाठी माती, झाडांच्या फांद्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत असल्याने जंगल संपत्ती व सुपीक मातीचा ºहास होत आहे.धामणी नदीवर अशा पद्धतीच्या समांतर बंधाºयासह लहान-मोठे सुमारे आठ ते नऊ बंधारे घातले जात असून, दरवर्षी सुमारे २0 लाख रुपये खर्च करावा लागतो. तसेच जीव धोक्यात घालून शेतकºयांना काम करावे लागत आहे. परिणामी, मातीच्या बंधाºयांमुळे बळिराजा अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.
धामणी परिसरातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सन २००० साली धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. आज वीस वर्षे पूर्ण झाली. पण या प्रकल्पाचे काम अर्धवटच आहे. परिसरात कोणताच प्रकल्प नसल्याने शेतकºयांना फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणी संपत आले की वाळत चाललेल्या पिकांकडे केविलवाण्या नजरेने बघण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो.शेवटी शेतकरी आभाळाकडे नजरा लावून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात बसतो. प्रत्येक वर्षाचे हे दुष्टचक्र असल्याने येथील शेतकरी शेती असूनही आर्थिक मागासलेला आहे.ठराव गोळा करण्याचे काम सुरूलोकप्रतिनिधी फक्त निवडणूक लागली की यावर्षी धामणी प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे आश्वासने देत मतांचा जोगवा मागतात. निवडणूक होताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या.. अशी गत होत आहे. या सर्व भूलथापांना वैतागून शेतकºयांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत धामणी प्रकल्प पूर्ण होत नाही. या परिसरातील जनतेचा पाण्याचा वनवास संपत नाही तोपर्यंत येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाणार आहे. आता नाही तर केव्हाच नाही, अशा निर्णयाप्रत शेतकरी आला आहे. परिसरातील चाळीस वाड्या-वस्त्यांतील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. त्यासाठी धामणी खोरा विकास कृती समितीकडून गाववार सभा घेऊन ग्रामपंचायतींचा बहिष्कार निर्णयाचा ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.