मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:44 PM2020-02-07T16:44:43+5:302020-02-07T16:50:36+5:30
‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. त्यामुळे दिवसभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय फुलून गेले होते.
कोल्हापूर : ‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. त्यामुळे दिवसभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय फुलून गेले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन त्यामध्ये ग्राम काँग्रेस कमिट्या, बूथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नवसन करण्याबाबत कार्यक्रम देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेऊन सूचना केल्या.
ज्या गावात ११ ग्रामपंचायत सदस्य तेथे चार ग्रामकमिट्या, १५ सदस्य तेथे पाच कमिट्या, १७ सदस्य तेथे सहा ग्रामकमिट्या नेमण्याच्या सूचना केल्या. ग्रामकमिटीमध्ये तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा समावेश नसावा.
प्रत्येक गावामध्ये ग्राम काँग्रेस कमिटीचा फलक लावावा. फलकावर जिल्हाध्यक्ष, ब्लॉक कमिटी अध्यक्ष, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षांची नावे नमूद करावीत. प्रत्येक कमिटीने पक्षाचे काम म्हणून शासकीय योजनांसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत घरोघरी माहिती पोहोचवावी, अशाही सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुुप्रया साळोखे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. गुलाबराव घोरपडे, हिंदुराव चौगुले, नामदेवराव कांबळे, जिल्हा कार्यालयीन सचिव संजय पवार-वाईकर, युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक थोरात, आदी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीत कॉल सेंटर
जिल्ह्यात सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठन दि. ३१ मार्चपर्यंत करण्याच्या सूचना केल्या. कमिटीने प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करावा. त्यासाठी काँग्रेस कमिटीत कॉल सेंटर स्थापन करणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
नऊ तालुक्यांच्या बैठका
करवीर, हातकणंगले, शिरोळ, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी या नऊ तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन काँग्रेस कमिटीत घेऊन पालकमंत्री पाटील यांनी सूचना केल्या. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, कागल, पन्हाळा, गगनबावडा यांच्या बैठका आठवड्यात घेण्यात येणार आहेत.
जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या
तालुकानिहाय चर्चा करताना आजरा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा मीनल इंगल यांनी, काँग्रेसच्या कार्यक्रमात जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी तक्रार केली. त्यावर, सर्वांना विश्वासात घेऊन पक्षासाठी काम करायचे आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
तालुका काँग्रेससाठी जागा
प्रत्येक तालुक्यात तालुकानिहाय काँग्रेस कमिटी उभा करण्याचे धोरण आहे. त्यासाठी तालुकानिहाय जागा सुचवावी, अशीही सूचना मंत्री पाटील यांनी केली. काँग्रेस पक्षाला एका झेंड्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.