मराठा आरक्षणाच्या लढ्याला शाहू छत्रपतींचे पाठबळ
कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयकांची सकाळी प्राथमिक स्वरूपात बैठक झाली. त्यामध्ये अन्य जिल्ह्यांमधील निमंत्रक, समन्वयकांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी न्यू पॅॅलेस येथील शाहू विद्यालयामध्ये कोल्हापुरातील समन्वयकांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून आंदोलनाबाबतची आचारसंहिता निश्चित केली. भूमिका आणि पुढील दिशा जाहीर केली असल्याचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी दिल्लीपर्यंत लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. माझे सर्वतोपरी पाठबळ राहील असे शाहू छत्रपतींनी सांगितले असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली.
लढ्याबाबतची सकल मराठा समाजाची आचारसंहिता
१) यापुढे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करण्यास कुणीही जाणार नाही.
२) सकल मराठा समाज आपल्या मागण्या लिखित स्वरूपात शासनाला देईल.
३) राजकीय अपप्रवृत्तींना तरुणांनी बळी पडू नये.
४) कोणत्याही जाती, धर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये कुणीही करू नयेत.
५) मराठा समाजाचे नेतृत्व सकल मराठा समाजच करेल. कोणत्याही राजकीय व्यक्तीने समाजाचे नेतृत्व करू नये.
६) मराठा समाजातील कोणत्याही युवकाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये.
७) सकल मराठा समाजाची राज्यभर एकच भूमिका राहील.
फोटो (०५०५२०२१-कोल-सकल मराठा समाज) : कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी शाहू छत्रपती यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, दिलीप सावंत, गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)