कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांसंबधी राज्य सरकारकडून निर्णय होईंपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन तोडू नयेत, अन्यथा गाठ आमच्याशी असेल, असा इशारा वीज बिल वाचवा कृती समितीने बुधवारी महावितरणला दिला.महावितरणचे कर्मचारी घरोघरी जाऊन थकीत वीज बिलांच्या वसुलीचा तगादा लावत आहे. वीज कनेक्शन कट करण्याची धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समितीने ह्यमहावितरणह्णचे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा निर्णय होईपर्यंत थांबा, असे सांगितले. यावर निर्मळे यांनीही याबाबत सरकारकडून परवानगी घेतो, असे सांगत आदेश येईपर्यंत कोणाचेही कनेक्शन कट होणार नाहीत, अशी ग्वाही दिली.यावेळी प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, निवासराव साळोखे, विक्रांत पाटील किणीकर, बाबा पार्टे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब देवकर, महादेव सुतार, जावेद मोमीन, मारुती पाटील उपस्थित होते.