कोल्हापूर : समाजसेवा करायला तुमच्या खिशात पैसेच पाहिजेत असं काही नाही. जर तुमची मनापासून इच्छा असेल आणि गरीबाबद्दल कणवळ असेल तर सर्व काही साध्य होेते याचा प्रत्यय शनिवारी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात आला.
प्रमिलाराजे रुग्णालयात अनेक गोरगरीब रुग्णांना सामाजिक भावनेतून उपचारासाठी निस्वार्थीपणे मदत करणारे महादेव पाटील यांचा वाढदिवस ही प्रचिती आणून देण्यास कारणीभूत ठरला. महादेव पाटील यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनी रक्कम जमा करून त्यांना मदत देण्याचं ठरवले ,पण या दिलदार मनोवृत्तीच्या महादेव यांनी त्या रक्कमेत आपलाही वाटा घालून रुग्णालयाला साहित्यरूपी मदत देण्याचे निर्णय घेतला. त्यानुसार नर्सिंग मेससाठी रेफ्रिजरेटर तर अपघात विभागाला सक्शन मशीन आणि दोन बी. पी. तपासणी मशीन असे २२ हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे हे साहित्य प्रदान करण्यात आले.
महादेव सारख्या एक सामान्य व्यक्तीने,आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून रुग्णालयास उपकरणे दिली. त्यांचा हा उपक्रम इतरांनीही अनुकरण करावे असा असल्याचे डॉ. मोरे म्हणाले. यावेळी डॉ सुधीर सरवदे, डॉ. गिरीष कांबळे, आकाताई पाटील,माजी नगरसेवक ईश्वर परमार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुभाष नांगरे, ,आरोग्य रक्षक बंटी सावंत, संजय चिले, सुरेंद्र कांबळे,बाळासाहेब लिंबेकर, राजू नदाफ ,महावीर कदम, निलेश मोरे अजित ढवण,गणपती कोळी उपस्थित होते.