कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या उठाव शिल्पाचे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत हे सेवा रुग्णालय गरीब, गरजूंना चांगली वैद्यकीय सेवा देत आहे.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, सेवा रुग्णालयातील स्वच्छता आणि सेवेचा नाद करायचा नाही. येथे नियमित स्वच्छता केली जाते. या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचा पायाभरणी समारंभ २१ जून १८९७ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. त्या समारंभाच्या दुर्मिळ छायाचित्रावरुन उठावशिल्प (म्युरल) साकारण्यात आले. त्याचे अनावरण झाले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी राज्यकारभार करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे देखील विशेष लक्ष दिले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल म्हणजे आजचे वैद्यकीय सेवा रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला १२४ वर्षे पूर्ण होऊन यावर्षी १२५ व्या वर्षात पदार्पण होत आहे. या घटनेचे औचित्य साधून पायाभरणी समारंभाच्या दुर्मिळ छायाचित्रावरून उठावशिल्प (म्युरल) साकारण्यात आले. हे शिल्प वास्तुशास्त्रज्ञ वैशाली चौगुले, चंद्रकांत हल्याळ यांनी तयार केले आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, यशराजे छत्रपती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २६०६२०२१-कोल- सेवा रूग्णालय
कोल्हापुरातील कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उठाव शिल्पाचे अनावरण प्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजे छत्रपती, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी, डॉ. उमेश कदम उपस्थित होते.