मिलिंद देशपांडे
दत्तवाड : ग्रामसेवक बदली, चौदाव्या वित्त आयोगाची झालेली अफरातफर, जुन्या ग्रामपंचायत समोरील झालेली वृक्षतोड व गाळे बांधकाम, पाच वर्ष प्रलंबित असणारी नळपाणी योजना अशा विविध कारणाने मागील पाच वर्षांत दत्तवाड ग्रामपंचायतीचा कारभार गाजला आहे. तर वित्त आयोगाच्या कामात झालेल्या गडबडीबद्दल जिल्हा परिषद सदस्य स्व. प्रवीण माने यांनी जिल्हा परिषदेसमोर केलेले उपोषण यामुळे जिल्ह्यात दत्तवाड ग्रामपंचायतीचा कारभार गाजला होता.
गावची दोन कोटी रुपये मंजूर झालेली नवीन नळ पाणी योजना या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकली नाही. गावच्या रस्त्यांचा व गटारीचा प्रश्न ऐरणीवर आला. सरकारी दवाखान्यासमोर असणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभर गाजला. न्यायालयीन लढाईबरोबरच उपोषण करण्यात आले तर चौदाव्या वित्त आयोगातील कामात घोटाळा आढळल्याने याबाबत तक्रारी करण्यात आल्या. याबाबत ग्रामसेवकास निलंबित व बदली करण्यात आली तर संबंधित सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
सध्या इच्छुक तयारीला लागले असले तरी कोणती आघाडी होणार, कोणते गट एकत्र येणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ‘स्वाभिमानी’चा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर अवलंबून आहे तर इतर गटांबरोबर विविध ठिकाणी सध्या चर्चा सुरू आहेत.
चौकट - गावातील मातब्बर गट पाच वर्षांत बंडा माने व त्यांच्यानंतर त्यांचे नातू प्रवीण माने हे जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, दोघांच्या निधनाने गावातील माने गट आता पोरका झाला आहे. त्यामुळे सध्या गावात असणाऱ्या भवानीसिंग घोरपडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बबन चौगुले, बी. वाय. शिंदे यड्रावकर गट, उल्हास पाटील गट व शिवसेना, युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष नूर काले, भाजप असे विविध गट सध्या कार्यरत आहेत.
* सहा प्रभागांत - सतरा सदस्यसंख्या
* मतदार संख्या - ७१००