कोल्हापूर : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील १५१ विद्यार्थांना जिल्हा प्रशासनातर्फे प्राधान्याने कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली. त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार २८ दिवसानंतर मिळणार कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे. याबाबत योग्य कार्यवाही करण्याची विनंती महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
आमदार पाटील म्हणाले, परदेशांतील विविध विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांना विमानप्रवास आणि त्या देशात राहण्यासाठी लसीकरण झाले असणे बंधनकारक आहे. म्हणून अशा संबंधीत विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली होती. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली. ३ ते ५ जून या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी केलेल्या शहरातील ९४ विद्यार्थ्यांना तर जिल्ह्याच्या अन्य भागातील ५७ अशा एकूण १५१ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागातील ५७ विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रत्येकी तीन तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येईल.
चौकट
त्यांना २८ दिवसांनंतर
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ८४ दिवसांऐवजी आता २८ दिवसानंतर कोविशिल्डचा दुसरा डोस उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाच्या विषयाचा पाठपुरावा केल्याबद्दल एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, उमेश पाडळकर, सुजय चव्हाण, अक्षय शेळके, यश शिर्के, आदित्य कांबळे, आशुतोष मगर, संकेत जोशी, कुणाल पत्की आदींनी त्यांचे आभार मानले.
फोटो : ०८०६२०२१- कोल- भेट
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.