शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केंद्रीय समितीकडे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया होती. त्यात अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये दहावीची गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक होते. मात्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या एकूण ८४ विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रे अपलोड केली नाहीत. त्यात कोरोनाची प्रमाणपत्र आणि मित्राची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज छाननीच्या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नाही. त्यांना समितीने एसएमएस पाठवून आणि चारवेळा दूरध्वनी करून यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि अंतिम प्रवेश फेरीत अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. त्यांना या फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.
गुणपत्रिकेऐवजी चक्क कोरोनाचे प्रमाणपत्र केले अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:30 AM