संतोष मिठारीकोल्हापूर : मराठा, कुणबी समाजांतील उमेदवारांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आर्थिक बळ देणार आहे. ही संस्था सामुदायिक प्रवेश परीक्षा घेऊन २२५ उमेदवारांची निवड करणार आहे. या उमेदवारांना दरमहा प्रत्येकी १३ हजार इतके विद्यावेतन देणार आहे. त्यासह दिल्ली येथील नामवंत प्रशिक्षण संस्थेकडून त्यांना विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे.मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा कुणबी समाजातील उमेदवारांसाठी ही योजना असणार आहे. सन २०२० मध्ये होणाऱ्या ‘यूपीएससी’च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी ‘सारथी-दिल्ली यूपीएससी-सीईटी-२०१९’ ही प्रवेश परीक्षा दि. ३१ मार्चला घेण्यात येणार आहे. त्यातील गुणवत्ता यादीनुसार २२५ उमेदवारांची निवड केली जाईल.
या उमेदवारांना पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेची मूलभूत माहिती देण्यासाठी पुणे येथे १५ दिवस निवासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिल्लीतील प्रशिक्षण संस्थेची दोन लाखांचे शुल्क ‘सारथी’ भरणार आहे.
त्यासह प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी जाण्याचा खर्च, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी १५ हजार रूपयांचे एकतर्फी अनुदान देणार आहे. ‘सारथी’चे हे पाऊल मराठा, कुणबी समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अर्ज करण्याची मुदत आजपासूनसामुदायिक प्रवेश परीक्षेसाठी ‘सारथी’च्या संकेतस्थळावर आज, गुरुवारपासून आॅनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेतून निवडण्यात येणाºया २२५ जागांपैकी ३० टक्के जागा महिलांसाठी, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील असावा. तो पदवीधर आणि यूपीएससीची सन २०२० मधील परीक्षा देण्यासाठी पात्र असला पाहिजे. त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली असावे.
विविध उपक्रम, योजना‘सारथी’ने विविध अभिनव उपक्रम, योजनांची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत स्मार्ट सिटी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत एक हजार उमेदवारांना प्रशिक्षण, महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी २५० जणांना, यूजीएसी-नेट, सेट परीक्षेसाठी १५०० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘यूपीएससी’च्या तयारीसाठी २२५ जणांना नि:शुल्क प्रशिक्षण ,आदींचा समावेश आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विविध योजनांबाबतची वर्तमानपत्रांमधील जाहिरात आणि ‘सारथी’च्या संकेतस्थळावरील माहिती योग्य पद्धतीने वाचून, समजून घेऊन अर्ज करावा. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनी केले.
मराठा आणि कुणबी समाजांतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी ‘सारथी’ने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. राज्य सरकारने ‘सारथी’ला एक हजार कोटींचा निधी देऊन सक्षम करावे. या संस्थेचे उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात लवकर सुरू करावे.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.