लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून युरियाची टंचाई भासू लागली आहे. सध्या ऊसाची भरणीसह इतर पिकांना खतांची गरज असताना विक्रेत्यांच्या गोडावूनमध्ये ठणठणाट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा साखर कारखान्यांचा हंगाम लवकर आणि विना अडथळा सुरू झाल्याने ऊसाची तोड लवकर झाली. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुटलेल्या ऊसाची खोडव्याबरोबरच याच कालावधीतील लागणीही भरणीसाठी आलेल्या आहेत. त्याचबरोबर सूर्यफुल, भुईमूग, मका आदी पिकांनाही सध्या खताची गरज आहे. युरिया वगळता इतर खतांचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे युरिया हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. ऊसाच्या भरणीला उशिर झाला तर वाढीवर परिणाम होतो.
‘आरसीएफ’, ‘झुआरी’, ‘कृभको’, ‘इफको’चा युरिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो. गेले पंधरा दिवस जिल्ह्यात युरिया खत मिळत नाही. शेतकरी, खत विक्रेते विकास संस्थांकडे हेलपाटे मारत आहेत. आज येईल, उद्या येईल, या पलीकडे विक्रेते काही सांगत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रेक निघाली पण पोहोचलीच नाही
‘आरसीएफ’ कंपनीची १३०० टनांची रेक गेल्या आठवड्यात निघाल्याचे विक्रेत्यांना सांगण्यात आले. मात्र, ती कोल्हापूरात पोहोचलीच नाही. आता रविवारी कोल्हापूरकडे सुटली असून दोन दिवसांत युरियाची टंचाई दूर होईल, असे सांगण्यात येते.