दत्तवाड : दत्तवाड जिल्हा परिषद पोटनिवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर जानेवारी-फेब्रुवारीत होण्याच्या शक्यतेने आत्तापासूनच उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्यापासून गावागावांत संपर्कही वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे.
या मतदारसंघामध्ये दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, टाकळीवाडी, टाकळी, नवे दानवाड, जुने दानवाड, राजापूरवाडी, राजापूर, खिद्रापूर ही दहा गावे येत असून यापैकी घोसरवाड, दतवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी या चार गावांतील ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीबरोबरच रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक होईल अशी राजकीय अटकळ आहे. प्रवीण माने यांच्या निधनाने ही जागा रिक्त असून दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेसकडे आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत महाआघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती. यात अपक्ष उमेदवार विजीत शिंदे यांनी रंगत आणली होती, तर राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवीण माने यांनी बाजी मारली होती. मात्र, त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे.
काँग्रेसकडून माजी उपसभापती भवानीसिंग घोरपडे, हरिश्चंद्र पाटील, विजीत शिंदे, नूर काले, उदय पाटील यांच्या नावाची चर्चा असून भाजपकडून हेरवाडचे आर. बी. पाटील, सुरेश पाटील, दत्तवाड शहराध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी उमेदवारी मागितली असली तरी मतदारसंघाबाहेरील सुशांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संपूर्ण दहा गावांत संपर्क असणारे उमेदवार सध्या भाजपकडे नाहीत. राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते यावरच भाजपची उमेदवारी अवलंबून आहे. राष्ट्रीय काँग्रेसकडे महाआघाडीतील सर्व पक्षांना एकत्र करण्याची व बंडखोरी न होऊ देण्याची चिंता असताना भाजपकडे मात्र उमेदवारीचा वानवा दिसत आहे.