जयसिंगपूर : येथील नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे २५ आॅक्टोबर रोजी होणारी १५वी ऊस परिषद विक्रमसिंह मैदानावर न होता झेले चित्रमंदिरलगत असणाऱ्या मैदानात होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यंदाचा ऊसदर ठरविण्यासाठी ही ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी गावागावांत तयारी सुरू आहे. ही ऊस परिषद उच्चांकी करण्यासाठी राज्यासह सीमाभागातही जनजागृती सुरू आहे. त्यामुळे यंदाही उच्चांकी ऊस परिषद होण्याचा अंदाज आहे. या ऊस परिषदेकडे महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस परिषद घेतली जाते. सध्याची ऊस परिषद ही १५वी असून, जयसिंगपूर येथे १३ ऊस परिषदा पार पडल्या आहेत, तर एक ऊस परिषद कोल्हापूर येथे झाली होती.१४व्या ऊस परिषदेत खासदार शेट्टींनी किमान वाजवी किफायतशीर एफआरपी रक्कम विनाकपात एकरकमी मिळावी, हा ऊस परिषदेचा हेतू होता. एकरकमी एफआरपी न देणारे कारखाने बंद पाडू, असा इशारा मागील वर्षी दिला होता.यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा जादा दराची घोषणा न करणारे कारखाने बंद पाडू, असा इशारा संघटनेने दिला आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नसल्याने खा. शेट्टी यांनी कर्नाटक सीमाभागातही लक्ष केंद्रित केलेआहे.या भागातील कारखानदारांकडे योग्य तो भाव मागितला जाणार असून, कारखान्यांवर स्वाभिमानीचा एल्गार दाखवून शासनाकडे दाद मागण्याची तयारी स्वाभिमानीने केली आहे. मराठवाड्यात प्रकाश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांत ऊस परिषदेसाठी जनजागृती सुरू आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष जालिंदर काटे, जि. प. सदस्य सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका, मेळावे सुरू असून, परिषद यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानीने वज्रमूठ बांधली आहे.
ऊस परिषद ठरणार उच्चांकी
By admin | Published: October 23, 2016 12:48 AM