आयुब मुल्ला - खोची -जिल्ह्यातील सोयाबीन पेरण्यांचे प्रमाण पावसाने रखडले आहे. मात्र, शासनाने शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरा, असे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व शासनाच्या कृषी विभागाने गावोगावी एप्रिल, मे महिन्यांत प्रबोधन केले. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास ३२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यापैकी आठवड्यात त्यातील दहा टक्के बियाणांचा वापर झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या आवाहनानुसार चांगला प्रतिसाद देत स्वत:कडील ८० टक्के बियाणे उपलब्ध केले आहे. त्यामुळे इतर २० टक्के बियाणे वापरात येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्वत:कडील बियाणे वापरण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहील, अशी स्थिती आहे.सोयाबीन बियाणांच्याबाबतीत गेल्या अनेक वर्षांत उगवणी संदर्भात अनेक तक्रारी आल्या. बनावट बियाणे लागल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले, परंतु त्याची भरपाई मिळणे कठीण होत होते, अशाप्रसंगी बियाणे खरेदी करताना काळजी घेणे हा महत्त्वाचा मुद्दा होता, परंतु त्याहीपुढे जाऊन आता स्वत:कडील बियाणे वापरण्याची पद्धत पुढे येत गेली. शासन त्यासाठी पुढाकार घेऊ लागले.यावर्षी केलेल्या आवाहनास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, शेतकरी आपल्याकडील बियाणे वापरत आहेत.जिल्ह्यात ५२ हजार ८00 हेक्टरचे नियोजनहेक्टरी ७५ किलो बियाण्यांच्या पेरणीनुसार ३९ हजार ६०० क्विंटल बियाणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५२ हजार ८०० हेक्टरचे नियोजन केले आहे. या क्षेत्राचा विचार करता जिल्हा परिषद व शासनाचा कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून ३१ हजार ७९२ क्विंटल बियाणे उपलब्ध केले असून, त्याचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंत ३ हजार ३६ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मोठ्या कागदाच्या दहा घड्या कराव्यात. प्रत्येक घडीत १० बियाणे बसतील, अशी घडी करावी. दहा घड्यात १०० बियाणे बसवावीत. कागदाच्या दोन्ही बाजूस दोरा बांधावा. तयार झालेल्या या घडीचा कागद पाण्यात दोनवेळा बुडवावा. तीन दिवस हा प्रयोग करावा. त्यानंतर कागद उघडावा. अंकुर आलेले बियाणे दिसतील. त्यानुसार उगवणीचे प्रमाण समजेल. ७० बियाण्यांना अंकुर आले, तर ७० टक्के उगवणीचे प्रमाण समजावे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व अशी पद्धत वापरावी.- चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
३२ हजार क्विंटल बियाण्यांचा होणार वापर
By admin | Published: June 18, 2015 12:06 AM