सुभाष कदम -चिपळूण -राज्यात वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे शासनाने गणवेश निर्धारित केला आहे. त्यासाठी शासनाने सन १९९५मध्ये दोन आदेश जारी केले. या निर्णयाप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणवेशावर कोणते स्टार वापरावेत हे निश्चित झालेले असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी अतिरिक्त स्टारचा वापर करत आहेत. याकडे खातेप्रमुख व मंत्र्यांचेही दुर्लक्ष होत आहे. वनखात्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले क्षेत्रिय काम करताना किंवा दौऱ्याच्यावेळी गणवेश वापरणे बंधनकारक आहे. याबाबतची मानकेही निश्चित आहेत. परंतु, पोलीस किंवा इतर खात्यांप्रमाणे आपलेही वर्चस्व दाखवण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी आपल्या स्तरावर गणवेशाच्या मानांकनामध्ये बदल करुन मनमानी करत आहेत. ही घटना गंभीर असून, शासन आदेशाचा व भारतीय दंड संहितेचा भंग करणारी आहे. यासाठी कलम ४६६, ४६७ व ४६८ नुसार दोषींना दंड होऊ शकतो. वनपाल असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभ्रधातुचे पंचकोनी २.५ से. मी. आकाराचे कोणतेही नक्षीकाम नसलेले एक स्टार वापरता येते. वनक्षेत्रपाल पदावरील ७ वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना २ स्टार तर ७ वर्षापेक्षा अधिक सेवा असलेले अधिकारी ३ स्टारसाठी पात्र असतात. वनक्षेत्रपाल व वनपालाची नामनिर्देशन पट्टी २ से. मी. ते ८ से. मी. प्लास्टिक काळी व त्यावर पांढरी अक्षरे अशी असते.या दोघांच्याही गणवेशाचा ढाचा शासनाने ठरवून दिला आहे. असे असतानाही हे अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे स्टार लावून दौऱ्यावेळी फिरत असतात. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट गांभीर्याने पाहिली जात नाही. त्यामुळे गणवेश व मानकातील बदलाला राजमान्यता मिळाली की काय अशी चर्चा सुरु आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर असताना त्यांची खानपानाची व राहण्याची व्यवस्था तेथील स्थानिकच करत असतात. शासन नियमानुसार त्यांनी शासकीय विश्रामगृहावर राहावे व तेथील भोजन घ्यावे असे अपेक्षित आहे. परंतु, सोकावलेले हे अधिकारी खासगी सोयीला प्राधान्य देतात. प्रवास बिले मागताना संबंधितांकडे योग्य ती पावती नसली तरीही काहींना बिले अदा केली जातात. परंतु, काही अपवादात्मक अधिकारी अशी बिले शासनाकडून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. वनखात्याच्या या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारवाईची मागणी : सारेच ढिम्मवनखात्याला स्वतंत्र मंत्री असतानाही या खात्याचा कारभार ढिम्मच आहे. त्यामुळे वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी गणवेशासाठी नेमून दिलेले स्टार न वापरता अतिरिक्त स्टार वापरतात. ही बाब लक्षात कशी येत नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.गंभीर घटनागणवेशाच्या मानांकनामध्ये बदल करणे ही घटना गंभीर आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांच्या गणवेशावर अतिरिक्त स्टार्सचा वापर
By admin | Published: November 09, 2015 9:00 PM