कोल्हापूर : रोकडरहीत व्यवहारासाठी सरकारने आणलेले ‘भिम अॅप’ हे सर्वांसाठी फायदेशीर असून त्याचा प्रत्येकाने वापर करावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी येथे केले.
बिंदू चौक येथील भाजपाच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनिल डाळ्या, जिल्हाध्यक्ष डॉ. अजय चौगुले, सरचिटणीस डॉ. विनायक परुळेकर आदींची होती.
पाटसकर म्हणाले, ‘भिम अॅप’ पूर्णत: करमुक्त असल्याने यासाठी कोणताही विशेष आकार घेतला जात नाही. पैशाची देवाण घेवाण सुलभ होते. विद्यार्ध्यांपासून ते व्यावसाईकांपर्यंत हे अॅप सर्वांना वापरण्यास सोपे झाले आहे.
डॉ. अजय चौगुले म्हणाले, पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात २ लाखांहून अधिक ‘भिम अॅप’चे वापरकर्ते होण्यासाठी युवा मोर्चामार्फत मोहिम राबविण्यात येणार आहे.
भाजपा स्थापना दिवसापासून सुरु होणाऱ्या सात दिवसांच्या या मोहिमेत कार्यकर्ते मंडलस्तरापासून गावस्तरावर या अॅपचे फायदे आणि गरज या विषयी माहिती देतील. यावेळी सरदार खाडे, महेश पाटील, अक्षय मोरे, आशिष पाटील, अॅड. अमर पाटील, सचिन शिपुगडे, दिग्वीजय पाटील, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.