कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक सहाय्यता निधीसाठी केलेली दोन कोटी रुपयांची तरतूद रहित करून ती पूर्ववत धार्मिक कार्यासाठीच वापरण्यात यावी, या मागणीसाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती व विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, सांप्रदाय यांच्यावतीने शिवाजी चौक येथे रविवारी निदर्शने करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक सहाय्यता निधीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वास्तविक भाविक मंदिरासाठी निधी अर्पण म्हणून देतात तेव्हा त्याचा विनियोग धार्मिक कार्य व मंदिराच्या विकासासाठी व्हावा. यासह अध्यात्म प्रसार, मंदिराची देखभाल, दुरुस्ती यासाठीच वापरणे आवश्यक आहे. मात्र, असे न करता समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाख, तर राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. राज्यातील सर्वच रुग्णालयांना औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळत असतो. त्यामुळे भाविकांकडून दान झालेला निधी हा कटाक्षाने मंदिरासाठीच वापरला पाहिजे. या कारणासाठी रविवारी सकाळी शिवाजी चौक येथे श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली. यावेळी कृती समितीचे मधुकर नाझरे, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे, महेश उरसाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे शहराध्यक्ष शरद माळी, हिंदू महासभेचे नंदू घोरपडे, मनोहर सोरप, शिवसेना उपशहर प्रमुख शशी बिडकर, रणजित आयरेकर, डॉ. मानसिंग शिंदे, किरण दुसे, सुधाकर सुतार, डॉ. शिल्पा कोठावळे, विजया वेरुणेकर, अंजली कोटगी, मृणाल गावडे, सुरेंद्र पुरेकर, भाऊ पाडळेकर आदी उपस्थित होते.
निधी धार्मिक कार्यासाठीच वापरा
By admin | Published: April 17, 2017 1:01 AM