कोल्हापूर : ‘देशाच्या आर्थिक विकासात ऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच ऊर्जा संवर्धनाबरोबर व्यावसायिक इमारतींमधून नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त विजय खोराटे यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. कोल्हापूर महानगरपालिका आणि महाऊर्जा (मेडा) यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘एनर्जी कॉन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड आणि ग्रीन बिल्डिंग’ या विषयांवरील कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात खोराटे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर मोहन गोंजारे होते. ऊर्जेची बचत म्हणजेच ऊर्जानिर्मिती होय. त्यामुळे ऊर्जेचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. ऊर्जा संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजेत. व्यावसायिक इमारतींमधून जास्तीत जास्त नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केल्यास वीज आणि पाण्याचा वापर कमी होतो, असे उपायुक्त खोराटे म्हणाले. आर्थिक विकास हवा असेल तर आपणाला ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. देशातील ऊर्जा निर्मिती, त्याची क्षमता आणि मागणी या सगळ्या गोष्टींचा विचार करता उपलब्ध होणारी ऊर्जा ही अत्यंत काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे उपमहापौर मोहन गोंजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात मुंबईच्या ‘रचना इन्स्टिट्यूट’चे शिरीष देशपांडे, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे, ‘क्रीडाई’चे अध्यक्ष गिरीष रायबागे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस् असोसिएशनचे अध्यक्षा गिरीजा कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. ‘मेडा’चे व्यवस्थापक हेमंत पाटील यांनी स्वागत केले, तर मनपा नगररचनाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी प्रास्ताविक केले. गौरी चोरगे यांनी आभार मानले. कार्यशाळा दोन सत्रांत झाली. यामध्ये हरित इमारत संकल्पनेची ओळख, आवश्यकता आणि सद्य:स्थिती, एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड (इसीबीसी, इसीबीसी अंमलबजावणीचा पथदर्शी कार्यक्रम), आदी विषयांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर आवश्यक
By admin | Published: February 01, 2015 11:19 PM