कोल्हापूर : शहरात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी येणाऱ्या काळात प्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे केले.कोल्हापूर हॉटेल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीबाबतच्या बैठकीत आयुक्त कलशेट्टी मार्गदर्शन करीत होते. असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी आयुक्तांचे स्वागत केले. तसेच प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन सहकार्य करील, असे आश्वासन दिले.हॉटेल व्यावसायिकांनी महापुराच्या काळात दिलेल्या योगदानाबद्दल आयुक्त कलशेट्टी यांनी आभार व्यक्त केले. यापुढे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.‘सह्याद्री’चे मालक सुशांत पै यांनी प्लास्टिक बंदीमुळे हॉटेल व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली.
पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी प्लास्टिकबाबतच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती दिली. अनिल चौगुले यांनी प्लास्टिक वापराला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर वाढवावा, तसेच जुन्या काळात जेवणासाठी ताट म्हणून वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पाणाच्या पत्रावळ्या, केळीची पाने यांचा वापर मानवाच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची माहिती दिली. असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन शानबाग यांनी आभार मानले.यावेळी बाळ पाटणकर यांच्यासह हॉटेल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक, माहिती, शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार व पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी उपस्थित होते.