कोल्हापूर : वीटभट्टीच्या मालकास उधारीचे पैसे भागवण्यासाठी ३१ हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचे मंगळवारी उघड झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तपास करून वीटभट्टीवरील कामगार शाहीर सुखदेव वाघमारे (वय ३७, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर), तानाजी पांडुरंग भोगम (वय ५१, रा. भोगमवाडी) व नोटा प्रिंटिंग करणारा अमित मारुती काटकर (वय ३०, रा. आरळे, ता. करवीर) या तिघांना अटक केली आहे. त्याचबरोबर लॅपटॉप, प्रिंटर आदी साहित्य जप्त केले. याबाबत नारायण जाधव (रा. भोगमवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे.शाहीर वाघमारे हा मजूर नारायण जाधव यांच्या वीटभट्टीवर कामाला होता. काम संपल्यानंतर त्याचा हिशेब केला. तेव्हा ५० हजार रुपये तो देणे लागत होता. वाघमारे याने दुसऱ्या वीटभट्टीचा मालक तानाजी भोगम यांच्याकडे कामास येतो, असे सांगून ॲडव्हान्स मागितली.भोगम याने त्याला ५० हजार रुपये दिले. ते पैसे वाघमारेने जाधव यांना दिले, तेव्हा यात ३१ हजारांच्या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. जाधव यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर भोगम याचा नातेवाईक असणारा अमित काटकर याने आपल्या घरात प्रिंटरवर बनावट नोटा छापून दिल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करीत आहेत.
Crime News kolhapur: उधारी भागवण्यासाठी बनावट नोटांचा वापर, कलर प्रिंटरवर छापल्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 3:45 PM