कोपार्डे : बालिंगा पंपिग हाऊसपासून चंबूखडी पाण्याच्या टाकीपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. या गळतीला कारंज्याचे स्वरूप प्राप्त झाले असून लाखो लिटर शुध्द पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक पोती व त्यावर दगड ठेवून गळती लपविण्याचा अजब प्रकार पहायला मिळत आहे.
निम्म्या कोल्हापूर शहराला बालिंगा येथील भोगावती नदीतून पाणीपुरवठा केला जातो. हे पिण्याचे पाणी भोगावती नदी पात्रातून बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुध्दीकरण केले जाते. तेथून ते शिंगणापूर येथील चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून कोल्हापूर शहर, उपनगरांत पाणीपुरवठा केला जातो. पण या पाईपलाईनला ठिकठिकाणी मोठमोठी गळती लागल्याने शहरांत कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाईची स्थिती आहे. मात्र, असे असतानाही जिथे गळती लागली आहे, त्या पाईपलाईनची कायमस्वरूपी गळती बंद करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
हे गळतीरूपी कारंजे कोणाच्या लक्षात येऊ नयेत यासाठी कर्मचारी धडपड करताना दिसत असून चंबूखडी ते बालिंगा पंपिग स्टेशनपर्यंत आठ ते दहा गळत्यांवर प्लास्टिक पोते टाकून त्यावर दगड ठेवून ही गळती झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण प्रचंड दाबाने पाणी सुरू असल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. शिवाय ज्या शेतात गळती लागली आहे तेथील परिसर खारफुटीची बनू लागला आहे.
एकीकडे शहर व उपनगरातील जनता पिण्याच्या पाणीटंचाईला तोंड देत आहे. तर दुसरीकडे गळती काढणे शक्य असताना त्याकडे महानगरपालिकेने अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फोटो : ०५ शिंगणापूर पाणीगळती
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून त्यातून कारंजाप्रमाणे पाणी वाहत आहे. तर काही ठिकाणी अशा गळत्यांवर प्लास्टिक पोती व दगड ठेवून ही गळती लपविण्याचा प्रयत्नही सुरू आहे.