कोल्हापूर : रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामाला नगररचना (टीपी) आणि जलसंपदा विभागातील अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.
मूलभूत सोयीसुविधांअंतर्गत मंजूर झालेला २५ कोटींचा निधी कोरोना आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राजेश क्षीरसागर म्हणाले, एकीकडे केंद्र व राज्य शासन उपलब्ध निधीचा वापर कोरोना संकटावर मात करण्यासाठी करीत असताना, कोल्हापूर महानगरपालिका राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या २५ कोटींच्या निधीचा वापर लोकांच्या आरोग्याशी निगडित सोयीसुविधा, उपचार यंत्रणा राबविण्याऐवजी विकासकामांवर करीत आहे.
निधी मंजूर झाला होता त्यावेळची स्थिती वेगळी होती. आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी निधीची गरज आहे. वास्तविक हा निधी महापालिकेच्या दवाखाने सुधारणांसाठी खर्च होणे आवश्यक होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने याचा वापर करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा कितपत योग्य आहे? या विकासकामांचा निधी खर्ची पाडण्यास कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास इतकी घाईगडबड का? सध्या नागरिकांच्या जिवापेक्षा विकासकामास प्राधान्य देणे, हे शोभनीय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यांना उपचारासाठी ठेवावे लागणार आहे.यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किशोर घाटगे, दीपक गौड, अंकुश निपाणीकर उपस्थित होते.