कोल्हापूर : निवडून येण्यासाठीच्या क्लृप्त्या आणि तंत्रांचा वापर नगरसेवकांनी शहर विकासासाठी केल्यास शहराचा विकास निश्चित होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले. निवडणुकीत नॅनो कार, फ्रीज, टीव्ही मागणे आणि देणे प्रवृत्तीवर ‘कोल्हापूर कॉलिंग’ काय करणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘कोल्हापूर कॉलिंग’तर्फे आयोजित ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची यावेळी उपस्थिती होती.पालकमंत्री पाटील म्हणाले, निवडून येण्यासाठी खूप खर्च केला आहे, आता मला प्रश्न, अडचणी सांगू नका, असे नगरसेवकांनी न म्हणता जनतेच्या कामात गुंतून घ्यावे. इंटरनेटच्या माध्यमातून अन्य महापालिकेत काय नवे केले जात आहे, याचा अभ्यास करून शहराच्या विकासासाठी सभागृहात आवाज उठवावा. या निवडणुकीत कर्तृत्ववान महिला निवडूून आल्या आहेत. पहिल्यांदाच पाच मुस्लिम समाजातील महिला सभागृहात आल्या आहेत. सर्वच नगरसेवकांनी गल्लीसाठी नव्हे शहर विकासासाठी कामाला लागावे व आपली वेगळी प्रतिमा तयार करावी. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, नगसेवकांनी पाच वर्षे चांगले काम केल्यास मतदार पुन्हा संधी देत असतात. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनीही शहराच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने योगदान द्यावे. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, महापालिकेतील घोडेबाजार, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावे. भाजपला अपेक्षित यश नाही मिळाले तरी कोणताही दुजाभाव न करता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शहर विकासासाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करतील. डॉ. अमर अडके म्हणाले, शासकीय पैसे स्वत:साठी न वापरण्याचे जिजाऊंच्या संस्कारांचे आचरण नगरसेवकांनी करावे. नगरसेविका उमा इंगळे, मेहजबीन सुभेदार, नगरसेवक राहुल चव्हाण, नियाज खान, महेश सावंत, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम यांची भाषणे झाली. ‘कोल्हापूर कॉलिंग’चे पारस ओसवाल यांनी स्वागत केले. महेश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित सर्व उपस्थित नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या १८ भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेड्यामहापालिकेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचे सांगून नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले, महानगरपालिकेत झालेला टीडीआर, पार्किंग, टॉवर, केबल असे घोटाळे बाहेर काढले आहेत. प्रसंगी पक्षाचाही विचार न करता यापुढेही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार आहे. पालिकेतील भ्रष्ट १८ अधिकाऱ्यांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात बेड्या घालेपर्यंत गप्प बसणार नाही. मुश्रीफ, सतेज गैरहजर..कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना निमंत्रित केले होते. तीन प्रमुख पक्षांचे नेते निवडणुकीनंतर एकाच व्यासपीठावर येणार म्हणून कुतूहल होते; पण मुश्रीफ, सतेज पाटील अनुपस्थित राहिले. सध्याच्या राजकीय घडामोडीची त्याला किनार असल्याची चर्चा या ठिकाणी होती. त्यामुळे कार्यक्रमास गर्दीही कमी राहिली.
निवडून येण्यासाठीचे ‘तंत्र’ विकासासाठी वापरा
By admin | Published: November 09, 2015 12:30 AM