कोल्हापूर : विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र व सामान्यज्ञान या विषयांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी ‘सायन्स पंडित’ हा उपक्रम उपयुक्त आहे, असे मत चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्यावतीने आयोजित अॅस्पायर एज्युकेशन प्रदर्शनांतर्गत घेण्यात आलेल्या ‘सायन्स पंडित’ स्पर्धेत कागलमधील जवाहर नवोदय विद्यालयाचा हृषीकेश राजाराम जाधव या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. चाटे स्कूल येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात प्रा. भारत खराटे यांच्या हस्ते त्याला पारितोषिक वितरण करण्यात आले. रोख रक्कम रुपये ५ हजार व स्मृतिचिन्ह असे बक्षिसाचे स्वरुप आहे. यावेळी प्रा. खराटे यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधण्यासाठीच्या या उपक्रमाचा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी आवड निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत विज्ञान आणि सामान्यज्ञानावर आधारित असे ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात हृषीकेश जाधव याने ५० पैकी ४१ गुण मिळविले.
‘सायन्स पंडित’ उपक्रम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
By admin | Published: June 20, 2015 12:44 AM