प्रदीप शिंदे - कोल्हापूर सध्याची तरुण पिढी इंटरनेट, सोशल मीडिया, गेमिंग व चॅटिंगच्या डिजिटल मायाजालात गुरफटलेली आहे. घरातील व्यक्तींशी बोलण्यापेक्षा त्यांना मोबाईलवर व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅटिंग करण्यात अधिक रस असल्याची ओरड आपल्याला ऐकावयास मिळते. मात्र, या सर्व गोष्टींना बगल देत निहाल मुल्ला या युवकाने याच सोशल मीडियाचा वापर फक्त टाइमपाससाठी न करता त्याचा सदुपयोग करून अनाथ मुलांना १२०० कपडे भेट दिले. सोशल मीडियाच्या उपयोगापेक्षा आता त्याच्या गैरवापराचीच अधिक चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन आहे. हे नवे तंत्रज्ञान आपण स्वीकारले खरे; पण त्याचा योग्य वापर करण्याचा विवेक अनेक युवकांकडे नाही. त्यामुळेच त्यावर बंदीची भाषाही सुरू झाली आहे. एका बाजूला माणसांच्या जगण्याला नवा आयाम देणारी, व्यक्त होण्यासाठी संधी प्राप्त करून देणारी ही नवी माध्यमे उपयुक्त आणि आवश्यकच आहेत. मात्र, त्यांचा गैरवापर आणि त्यातून उद्ध्वस्त होणारे अनेकांचे आयुष्य पाहता ही माध्यमे नकोतच, असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. संपर्कमाध्यमांचा वाढता प्रसार उपकारक ठरेल, असे मानले जात होते. त्यामुळे या क्षेत्राला प्रोत्साहन देणारी इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट वापरणारी मंडळी ही शिकलेली आहेत. बहुतांश मंडळी तर उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे यांचा योग्य वापर केल्यास योग्य दिशा मिळेल या उद्देशानेच नेहालने व्हॉट्स अॅप व फेसबुकवर फ्रेंडस् पॉवर ग्रुप तयार केला आणि याद्वारे समाजोपयोगी गोष्टी करण्याची क्रांती केली. शहरातील गोरगरीब मुलांसाठी कपडे देण्याचा निर्णय घेऊन या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आवाहन केले आणि पाहता-पाहता जुने व नवे ५५० कपडे जमा झाले. ते सर्व जमा करून त्याने इंदुमती बोर्डिंग आणि ‘अवनि’ या संस्थेतील गोरगरीब व अनाथ मुलांना दिले. या सामाजिक उपक्रमासाठी निहाल मुल्ला यांना साहिल देसाई, सूरज गोणी, निखिल बावडेकर, ऋषिकेश पुनिदकर, निहाल खेडेकर, शुभम म्हातुगडे यांची साथ मिळाली. या सामाजिक उपक्रमामुळे या सोशल साईटचा वापर चांगल्या कामासाठी होत आहे अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. युवकांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून या माध्यमांद्वारे फक्त अफवा पसरविणे, टाईमपास करणे हा विचार बाजूला ठेवून काम केल्यास हे एक प्रभावी हत्यार होईल. मी विवेकानंद महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. माझा व्हॉट्स अॅप व फेसबुकवर फ्रेंड्स पॉवर हा ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना मदत करीत असतो. अनाथ व गोरगरीब मुलांसाठी काय करता येईल, याबाबत आम्ही व्हॉट्स अॅपवर चर्चा केल्यानंतर जुने कपडे देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे आम्ही ग्रुपवर जुने कपडे देण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे १२०० जुने कपडे जमा झाले. ते आम्ही स्वच्छ धुऊन, इस्त्री करून इंदुमती बोर्डिंग व ‘अवनि’ या संस्थेकडे जमा केले. - निहाल मुल्ला
सोशल मीडियातून जपली सोशल बांधीलकी व्हॉट्स अॅपचा सदुपयोग :
By admin | Published: November 17, 2014 12:20 AM