कोल्हापूर : ‘ट्रॅफिक’ ही टेलिफिल्म वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठीच्या जनजागरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास चेतना अपंगमती विकास संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी व्यक्त केला.
येथील संवेदना फाऊंडेशनच्यावतीने वाहतूक सुरक्षेविषयी जनजागरण करण्याकरिता या टेलिफिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. या टेलिफिल्मच्या मुहूर्तावेळी खेबुडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
खेबुडकर म्हणाले, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक सुरक्षेबाबतची अनास्था दूर करण्यासाठी ही फिल्म मैलाचा दगड ठरेल. यावेळी संवेदनाच्या अध्यक्ष संजया कात्रे, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सचिव डॉ. ऋषिकेश जाधव, खजिनदार सुहास नाईक, विश्वस्त शिरीष पुजारी, टेलिफिल्मचे दिग्दर्शक उत्कर्ष जाधव यांच्यासह संवेदनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.