पन्हाळा : बांदिवडे मुक्कामाहून परत कोल्हापूर-नांदगाव फेरी करत असताना एस.टी. वाहक मोहन विलास पाटील (रा. आळवे) याला उत्रे (ता. पन्हाळा) येथे बसथांब्यावर गाडी अडवून तिघांनी बेदम मारहाण केली. यात पाटील हे जखमी झाले आहेत.
या मार्गावर बसची संख्या कमी असल्याने बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता वाहकाने गाडीत गर्दी असल्याने ‘काही विद्यार्थिंनींना मागील गाडीतून या’ म्हटल्याच्या रागातून संशयित अमोल शिवाजी पाटील (रा. उत्रे), रूपेश पांडुरंग पाटील, दत्तात्रय पांडुरंग सावंत (रा. कोतोली) यांनी वाहकाला गाडीतून खाली ओढत लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच वाहकाजवळील रोख रक्कम व किमती ऐवज लंपास केले. वाहकाच्यावतीने चालक पांडुरंग पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
वाहकाला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून, उत्रे येथील संशयित अमोल पाटील यांच्या आईने आपल्या मुलीला वाहकाने पास दाखवत असताना हात पकडून त्रास दिला व एस.टी.तून खाली उतरत असताना अपमानित केल्याची तक्रार पन्हाळा पोलिसांत दिली आहे. या मारहाण प्रकरणाचा एस. टी. महामंडळाच्या कामगार संघटनांनी निषेध व्यक्त करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक अजय पाटील, बिराजदार, संजय पारथी हे हजर होते. कामगार संघटनेच्या वतीने दिवसभर या मार्गावरील फेऱ्या बंद ठेवल्या होत्या.
प्रवाशांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. कर्मचाऱ्याचे वर्तन चुकीचे असेल तर एस. टी. प्रशासनाकडे तक्रार निवारण केंद्र आहे. त्याठिकाणी तक्रार करावी. एखाद्या कर्मचाºयास सेवा बजावत असताना मारहाण करणे म्हणजे कायदा हातात घेणे. या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी संशयितांवर कठोर कारवाई व्हावी. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- उत्तम पाटील, अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना, कोल्हापूर