कोल्हापूर : कंदलगाव, ता. करवीर येथील व्ही. जे. पाटील इंग्लिश मीडियम शाळेकडून जादा फी आकारली जात असून, ही शाळा हरित पट्टा असणाऱ्या जमिनीवर चालू असल्याने या शाळेची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, व्ही. जे. पाटील शाळा ही पहिली ते दहावी या वर्गाकरिता मंजूर आहे. या शाळेकडून नियमांपेक्षा जादा फी आकारणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच या संस्थेने एमबीएच्या शिक्षणासाठी परवानगी मागितली असून, या शाळेचा कारभार पाहता शासनाने परवानगी देऊ नये, तसेच शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून शाळेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कोट : शासनाची रीतसर परवानगी घेऊन शाळा स्वतःच्या जागेत उभारली आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फीमध्ये त्यांना वाहतूक, ड्रेस व शाळेचे सर्व साहित्य पुरवण्यात येते. यासाठी कोणत्याही प्रकारची जादा फी आकारली जात नाही. एमबीएच्या वर्गासाठी अद्याप परवानगी मागितली नाही.
-वसंत पाटील, संस्थापक, व्ही. जे. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, कंदलगाव.
फोटो : २२ कंदलगाव शाळा
ओळ : व्ही. जे. पाटील शाळेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.