कुंभोज : जादा असलेल्या विषय शिक्षकांना संरक्षण देऊन ३० जून २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या पदांवर पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आली.
निवेदनात रिव्हर्सन प्रक्रियेनंतर शिल्लक विषय शिक्षकांना आहे, त्या शाळेतच विज्ञान विषय शिकवण्यास लेखी परवानगी द्यावी. सदर शिक्षकांचे यापूर्वी २०१७ पासून ऑनलाइन बदली प्रक्रियेत विज्ञान विषयासाठीच मॅपिंग करण्यात आलेले आहे. त्याआधारे संबंधित शिक्षकांना विज्ञान विषय शिकविण्यास लेखी परवानगी द्यावी. ३० जूनअखेर रिक्त होणारी सर्व विस्तार अधिकारी श्रेणी ३ ची पदे तसेच सर्व केंद्र प्रमुख पदे पदोन्नतीने भरणेत यावीत. सध्या रिक्त असलेली सर्व अध्यापक पदे व वरील पदोन्नती प्रक्रियेनंतर रिक्त होणारी अध्यापक पदे विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्व रिक्त अध्यापक पदे लवकरात लवकर भरणेबाबत शासनाकडे पत्र व्यवहार व्हावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा नेते गोविंद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, राज्य संघटक पी. आर. पाटील, सुनील पोवार, शंकर पवार, दिगंबर टिपुगडे, अशोक शिवणे, विद्या कदम, शारदा वाडकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.
१८ कुंभोज शिक्षक निवेदन
फोटो ओळी-रिक्त पदे लवकर भरावीत, या मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना देताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील आदी.