कोल्हापूर : शहरातील ४५ वर्षांवरील परप्रांतीय बांधकाम मजुरांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी. त्यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी क्रिडाई कोल्हापूरने मंगळवारी केली. या संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांच्या विविध बांधकाम प्रकल्पावरील मजूर हे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय असून, ते असंघटित आहेत. एक सामाजिक जबाबदारी म्हणून आमची संघटना या मजुरांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेऊ इच्छितो. त्याप्रमाणे आम्ही सर्व सभासद आमच्या प्रकल्पांवरील वय वर्षे १८ ते ४५ वयाच्या आतील आणि ४५ वर्षांवरील अशा १,०२६ मजुरांच्या नावाची यादी आधार कार्डसह तयार केली आहे. शासनाने ४५ वयावरील लोकांची लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार या ४५ वर्षांवरील ७६ बांधकाम मजुरांचे लसीकरण तातडीने करावे. त्यासाठी मजुरांच्या वाहतुकीची व्यवस्था आम्ही करण्यास तयार आहोत. या मजुरांचे लसीकरण कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयास केल्यास ते सोईस्कर ठरणार आहे. त्यानुसार या लसीकरण मोहिमेस मान्यता द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी दिली. यावेळी सचिव प्रदीप भारमल उपस्थित होते.