सरुड : कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केवळ दोन डोसचे लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती चांदोली अभयारण्याचे वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली. वन क्षेत्रपाल नलवडे म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या कोरोना व ओमायक्रॉन च्या रुग्ण संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होऊ लागल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानास भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्या पर्यटकांनी कोविड १९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यानांच चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी प्रवेश देण्यात येईल. यासाठी प्रत्येक पर्यटकाचे लसीकरण केले असल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. डोस न घेतलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे तसेच शासन नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पर्यटकांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही वनक्षेत्रपाल नलवडे यांनी सांगितले.
कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्या पर्यटकांना चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 3:23 PM