वडणगे : करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या २१ विद्यार्थ्यांचे लसीकरण (वडणगे, ता. करवीर) येथील केंद्रावर मंगळवारी करण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे.
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५७ विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा परिषदेने या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीन तालुक्यांसाठी एका मध्यवर्ती ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम घेण्याचे नियोजन केले आहे. ही नोंदणी केलेल्या करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांचे लसीकरण वडणगे येथील केंद्रावर मंगळवारी करण्यात आले. वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. खलिपे आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले. आता २८ दिवसानंतर या विद्यार्थ्यांना दुसरा डोस मिळणार आहे.