कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सोमवारी शहरातील ३५ गरोदर महिलांना, तर शिक्षण व नोकरी, व्यवसायाकरिता परदेशी जाणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांचे व ४० दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने गर्भवती मातांचे विशेष लसीकरण सत्र पंचगंगा हॉस्पिटल येथे सोमवारी आयोजित करण्यात आले होते.
महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जानेवारी २०२१ ते जून २०२१ अखेर ५२३६ गर्भवती महिलांचे ए. एन. सी. रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. त्यापैकी सोमवारी पंचगंगा हॉस्पिटल येथे ३५ गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले.
शिक्षण, नोकरी, व्यावसायाकरिता परदेशी जाणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस १६ व दुसरा डोस ६१ विद्यार्थांना देण्यात आला. याशिवाय ४० दिव्यांग बांधवांचेही लसीकरण करण्यात आले.
दिवसात ३०७५ नागरिकांचे लसीकरण-
सोमवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील ३०७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत महापालिकेच्यावतीने एक लाख ३३ हजार ८८९ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ७८ हजार ३५० नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
आज, मंगळवारी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना प्राधान्याने दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.