शहर हद्दीत महापालिकेने अकरा नागरी आरोग्य केंद्रांत लसीकरणाची सुविधा दिली आहे. याशिवाय सीपीआर रुग्णालयासह खासगी १९ रुग्णालयांत हे लसीकरण सुरू आहे. याशिवाय लवकरच लक्षतीर्थ, पितळी गणपती मंदिर, विक्रमनगर या ठिकाणी जादा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राेज सरासरी तीन हजार व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. सोमवारी मात्र विक्रमी ३८८८ व्यक्तींना लस देण्यात आली.
लसीकरणाचा ताण कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर आला आहे. शहरातील ८५ टक्के नागरिकांनी महापालिकेच्या केंद्रांना प्राधान्य दिले आहे, तर सीपीआर रुग्णालयात तीन टक्के, तर खासगी रुग्णालयात १३ टक्के लसीकरण होत आहे. महापालिकेच्या केंद्रांवर होणारी गर्दी आणि कमी पडणारी लस लक्षात घेऊन नागरिकांनी सीपीआर रुग्णालयातही लस घेण्यास जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना चाचण्या वाढविणार-
शहरात रोज कोरोनाचे सरासरी ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जास्तीत जास्त व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील चाचण्यांची संख्या वाढणार आहे.