कोल्हापूर : जिल्ह्यातील केवळ ४५४ जणांना गुरुवारी विविध १११ केंद्रांवर लस देण्यात आली. २३३ जणांना पहिला डोस, तर २२१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. गेले सहा दिवस कोल्हापूरसाठी लस आलेली नसल्याने लसीकरण ठप्प आहे.एकीकडे लस उपलब्ध नाही, तर दुसरीकडे अनेक कर्मचारी संघटना, फ्रंट वर्कर लसीकरण व्हावे म्हणून प्रमुख अधिकाऱ्यांकडे मागणी करीत आहेत. त्यामुळे सर्वांना लस कधी येणार याचीच प्रतीक्षा आहे.
कोल्हापूर शहरात केवळ ६५ नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर शहरात गुरुवारी चार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतून केवळ ६५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महापालिकेकडे लस आली नसल्यामुळे लसीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.
गुरुवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे चार, महाडिक माळ येथे १०, सदरबाजार येथे ४४, तर सिद्धार्थनगर येथे सात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख १३ हजार १३० नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ३९ हजार ९५५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
४५ वर्षांवरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस घेण्यासाठी फोन येईल त्यांनीच फक्त संबंधित लसीकरण केंद्रावर शुक्रवारी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.