कोल्हापूर : महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कोविशिल्डचे ५,१४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १८ हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर व १८ ते ४५ वर्षापर्यंत ३,७९१ नागरिकांचे, ४५ ते ६० वर्षापर्यंत ९९९ नागरिकांचे व ६० वर्षावरील ३३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जे नागरिक केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत अथवा अंथरुणावरून खाली उतरू शकत नाहीत अशा व्याधीग्रस्तांना घरी जाऊन महापालिकेच्यावतीने लसीकरण करण्यात येत आहे. शुक्रवारी अशा नऊ व्याधीग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण केले.
आज, शुक्रवारी १८ वर्षे वयोगटावरील कोविशिल्डचा पहिला व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनीच फक्त महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी कोविशिल्डचा पहिला डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर तर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी राजारामपुरी येथे लसीकरण करण्यात येणार आहे.