कोल्हापूर : महानगरपालिकेला कोविशिल्डचे डोस उपलब्ध होताच शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी लस आल्याची माहिती कळताच पळापळा लस आली असे म्हणत नागरिकांनी शहरातील सर्वच केंद्रांवर गर्दी केली. पहाटेपासूनच लोकांनी रांगा लावल्या. शनिवार पेठ आणि फिरंगाई येथील लसीकरण केंद्रावर खूपच गर्दी झाली होती, यावेळी लोकांनी रांगा लाऊन लस घेतली.गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्यामुळे ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले, अशा नागरिकांची अस्वस्थता आज, गुरुवारी संपली. आज दहा दिवसांच्या खंडानंतर कोविशिल्डचे लसीकरण केले गेले. मात्र, ज्यांना नागरी आरोग्य केंद्रातून फोन येतील, त्यांनीच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाने केले आहे.महानगरपालिका प्रशासनास कोविशिल्डचे सात हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे आज, गुरुवारी सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर त्याचे लसीकरण सुरू झाले. पहिला डोस घेऊन ८४ पेक्षा जास्त दिवस झाले आहेत, अशांना प्राधान्यक्रमाने आरोग्य केंद्रातून फोन केले जात आहेत. त्यामुळे विनाकारण होणारी गर्दी नागरिकांनी टाळावे, असे लसीकरण नियंत्रण अधिकारी डॉ. अमोल माने यांनी केले आहे.२१३४ नागरिकांचे लसीकरणदरम्यान, बुधवारी शहरातील ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत ४५ वर्षांवरील २१२७ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व सात नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून २१३४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १७०, फिरंगाई २८१, राजारामपुरी २०३, पंचगंगा २२२, कसबा बावडा १८३, महाडिक माळ १६९, आयसोलेशन १८६, फुलेवाडी १६८, सदर बाजार २०५, सिद्धार्थनगर येथे १३५, मोरे मानेनगर येथे २१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत एक लाख २८ हजार ६४५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ५१ हजार ९१५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.