कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला लसीचा पुरवठा होत नसल्याने गेल्या चार दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे. अनेक नागरिक रोज नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन धडक मारत आहेत, पण लस मिळणार नाही, असे समजल्यानंतर निराश होऊन त्यांना घरी परतावे लागत आहे. लसीसाठी हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहरात लस उपलब्ध झालेली नाही. नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून केंद्राबाहेर रांगेत उभे राहतात. सकाळी दहा वाजता त्यांना आज लस मिळणार नाही म्हणून सांगितले जात आहे. चार-पाच तास रांगेत थांबूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. आरोग्य केंद्राबाहेर रोज केंद्राबाहेर नागरिक व केंद्रातील कर्मचारी यांच्यात वाद होतात. शाब्दिक चकमक उडत आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील केंद्राबाहेरही अशाच वाद निर्माण झाला. नागरिक वाद घालायला लागल्यानंतर पोलिसांना पाचारण केले जात आहे.
दरम्यान, महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे उद्या, शनिवारी (दि. ३ जुलै) पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ६० वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनच्या पहिला डोस देण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी ज्यांचे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहे, अशा ४५ वर्षांवरील पात्र नागरिकांनाही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
पुरेशी लस उपलब्ध नसल्यामुळे आज, शुक्रवारी सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे.
शनिवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदरबाजार, सिद्धार्थनगर, मोरेमानेनगर येथे ६० वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनच्या पहिला डोसचे लसीकरण सुरू राहणार आहे. तसेच घराजवळील लसीकरण मोहिमेअंतर्गत न्यू शाहूपुरी सासने मैदानजवळील हॉटेल कृष्णा इन येथे ६० वर्षे व त्यावरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे.