कोल्हापूर : कोविड लसीकरण मोहीम महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राबविण्यात येत असून, कोल्हापूर शहरातील परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता लसीकरण मोहिमेचे नियोजन महापालिकेच्यावतीने केले जाणार आहे.
शहरातील विविध वयोगटातील नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण सुविधा देण्यासंदर्भात लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात येणार आहे.
परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसहित उदा. परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळालेचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म असल्यास, तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रांसहित अर्ज करायचे आहेत. अशा विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम गुरुवार ते शनिवार अशा तीन दिवसांत सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पंचगंगा हॉस्पिटलमधील आरसीएच ऑफिसमध्ये सुशांत वंजारी यांच्याकडे समक्ष अर्जासहित अनुषंगिक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.